पालघर : फोडाफोडीच्या नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता पहिल्यांदाच टीका केल्याचं दिसून आलं. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे आता भाजपकडून त्याला काय उत्तर मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पालघरच्या डहाणू नगरपरिषदेमध्ये भाजपविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर ठाकरेसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजप विरुद्ध शिंदेंची सेना असा थेट सामना होणार आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात सर्वपक्षीयांनी मोट बांधल्याचं दिसतंय.
अहंकाराविरोधात एकत्र
डहाणूमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना एकनाथ शिंदे यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली. डहाणूमध्ये आपण सगळे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. अहंकारामुळे रावणाची लंकाही जळून खाक झाली. आता 2 डिसेंबरला तुम्हाला तेच काम करायचं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींनाही एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं. लाडक्या बहिणींचा चमत्कार या आधी विधानसभेला पाहिला आहे. तुम्ही जर ठरवलं तर, कुणीही आला तरी आपला विजय रोखू शकणार नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये भाजपकडून एकनाथ शिंदेंची माणसं फोडली जात आहेत. त्यावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चाही सुरू होती. याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी डहाणूमध्ये केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व आहे.
धाराशिवमध्येही सेना-भाजपमध्ये तणाव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप शिवसेनेतील तणाव कायम असल्याचं चित्र आले. धाराशिव येथील एका विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट झाली नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव शहरात असतानाही त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट टाळल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली पाठोपाठ धाराशिवमध्येही भाजप शिवसेनेत तणाव पाहायला मिळाला. दरम्यान, भाजपने पाठीत खंजीर खुपसल्याची टीका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलीय. त्यामुळे या दोघांमधील तणाव वाढत असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंची नाराजी कायम
भाजप-शिवसेनेतील पक्ष फोडाफोडीचा वादानंतर एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले, त्यांच्या समोर गाऱ्हाणं मांडलं, पण त्यांची नाराजी काही दूर झाली नसल्याचं चित्र आहे. पाटण्यात नितीशकुमारांच्या शपथविधीला हजेरी लावली तिथेही त्यांच्या देहबोलीतून हे दिसून आलं.
नीतिशकुमारांच्या शपथविधीवेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे नेते वेगवेगळ्या मार्गानं पाटण्यात पोचले. पण तिथं भेटल्यावरही दोघांमध्ये कोरडेपणाच राहिला. फडणवीसांनी स्मितहास्य करत नमस्कार केला, पण शिंदेंनी प्रत्युत्तरादाखल नुसती हात जोडून औपचारिकता दाखवली, ओठ हलवलेच नाहीत.